१ . अती
घ्यावीशी वाटते मला
उंच भरारी आकाशात
पण काय करू मी तरी
आकाशच नाही नकाशात
वाटते मला कधी कधी
पिऊन टाकावा सागर
अगस्तींना येईल राग
म्हणून घालतो आवर
कधी असेच वाटते मला
उचलावा कैलास पर्वत
घाबरून जाईल उगाच शंकर
ठेवतो त्याची मुर्वत
असे ही वाटते मला कधी
गिळावे सूर्य चंद्र
फेकून मारेल वज्र मग
घाबरून मला इंद्र
कधी तोडावे वाटते मला
शिवाचे धनुष्य
पण काय उपयोग तोडून आता
सीता नाही मनुष्य
कधी कधी वाटते मला
जाळावी आपणही लंका
पण कारण काय सांगावे
मनात येते शंका
कधी घुसळावा वाटतो सागर
करून मंदाराची रवी
जुनीच झाली कल्पना ही
काहीतरी नवी हवी
आता तर वाटते मला
थांबवावी पृथ्वीचीच गती
पण कल्पना आहे मला
हे जरा होतंय अती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा